मैत्रीची परतफेड

 

मैत्रीची परतफेड

एक छानशी गोष्ट माझ्या वाचनात आली. प्रत्यक्षात भागवतात असल्याचे मला आठवत नाही. पण वाचताना मित्रप्रेमाची साक्ष देणारी वाटली. ती माझ्या शब्दात लिहून काढली इतकच!

एकदा महर्षी विश्वामित्र ऋषी सांदिपनींच्या आश्रमात आले. त्याचवेळी आश्रमातले शिष्य फळ-कंदमुळं गोळा करायला वनात गेले होते. कृष्ण आणि सुदामाही बाकी शिष्यांसोबत वनात गेले होते. महर्षींचं स्वागत करायला आश्रमात पाणी आणि आसनाशिवाय बाकी काहीच सामग्री नव्हती. सांदिपनींनी विश्वामित्रांना पाय धुवायला पाणी आणि बसायला आसन दिलं. आपले शिष्य थोड्याच वेळात रानातून  ताजी फळं, कंदमुळं व रानमेवा घेऊन येतील तोवर थोडा विश्राम करावा; त्यानंतर आपला श्रमपरिहार होण्यासाठी लगेचच ताजा रानमेवा मिळेल अ‍से सांगून  आपण लगेचच काही खायला देऊ शकत नाही ह्या बद्दल विश्वामित्रांकडे दिलगिरी व्यक्त केली. पण विश्वामित्रच ते!

आसन ग्रहण करत विश्वामित्रांनी ध्यान लावलं असता सांदिपनींच्या पत्नीने कृष्णासाठी मुठभर पोहे जपून वेगळे ठेवले असल्याचं त्यांना लक्षात आलं. महर्षींना संताप आला आणि म्हणाले, ‘‘ठिक आहे. तुमच्याकडे जे मूठभर पोहे जपून ठेवले आहेत ते जो कोण खाईल त्याला कायमचं दारिद्र्‌य येईल.’’ सांदिपनींना हे माहित नव्हतं; पण कृष्णप्रेमापोटी मूठ भर पोहे ठेवलेले असल्याचं सांदिपनींच्या पत्नीनी सांगून वारंवार त्यांची क्षमा मागितली. पण महर्षी विश्वामित्र काही मानायला तयार होईनात.

जोवर सर्व मुलं फळ, कंदमुळं, रानमेवा घेऊन आश्रमात येतच होते नेमके त्याचवेळी महर्षी विश्वामित्र रागाने तरातरा निघून जात होते. खेळत, पळत, एकेकांचा पाठलाग करत येणार्‍या मुलांमधे सुदामा सर्वात पुढे होता. त्याने आश्रमात शिरतानाच आपल्या गुरूपत्नीचा आणि महर्षी विश्वामित्रांचा संवाद ऐकला. तो  ऐकून सुदामा स्तंभित झाला. वयाने व भयाने ऋषीमहाराजांना थांबवूही शकला नाही. तो पर्यंत कृष्ण आणि बाकी मुलेही  अनेक प्रकारचा रानमेवा घेऊन आश्रमात पोचले होते.

दुसर्‍या दिवशी यज्ञासाठी आणि आश्रमाच्या स्वयंपाकासाठी लागणारी लाकडं आणायला  सांदिपनींनी कृष्णाला सांगताच सुदामाही त्याच्यासोबत जायला तयार झाला. ऋषीपत्नीने काल रानतून आणलेली फळं मुळं शिदोरी म्हणून कृष्णापाशी दिली. कृष्ण हसून म्हणाला, ‘‘माई! मला थोडेसे पोहे दे ना बरोबर! तुझ्याकडचे पोहे फारच गोड लागतात.’’ कृष्णाने गुरुपत्नीला विनवून सांगताच ती कालचा प्रसंग आठवू थरारली. शेवटी तिने विचार केला, कंसाला मारणार्‍या कृष्णात देवत्व असल्याशिवाय का तो इतके असंभव काम करू शकेल? कृष्ण विद्वानही आहे, शूर आहे. त्याला कधी दारिद्र्य येणार नाही. तिने कृष्णासाठी राखून ठेवलेली ती पोह्याची पुरचुंडी कृष्णाच्या हवाली केली.

रानात गेल्यावर सुदाम्याला कालची घडलेली गोष्ट आठवत होती. आपल्या लाडक्या मित्राला दारिद्र्य यायला नको. त्याने ते पोहे खायला नको.  त्या साठी मला काहीतरी केलं पाहिजे अशा विचाराने सुदामा अस्वस्थ होता. त्याचवेळी जोरदार पावसाच्या सरी बरसायला सुरवात झाली. कृष्ण म्हणाला, ‘‘ सख्या सुदामा, आपण ह्या घनदाट झाडावर चढून बसू. त्याच्या पानांमुळे आपल्याला पाऊस लागणार नाही.’’ थोड्या वेळानी पाऊस ओसरला; पण, कृश असलेला सुदामा, वार्‍या पावसानी कुडकुडत होता. कृष्ण म्हणाला, ‘‘सख्या! तू झाडावरच थांब मी थोड्याच वेळात लाकडं तोडून आणतो.’’ सुदामाही अशाच संधीची वाट पहात होता.  कृष्णाने वृक्षावरून उतरण्यापूर्वी आपल्याकडील शिदोरी सुदाम्याच्या हातात दिली. ‘‘मी लाकडं तोडून आणल्यावर आपण अंगत पंगत करून खाऊ’’ असं म्हणत कृष्ण झाडावरून उतरताच सुदाम्याने सर्व पोहे खाल्ले. कृष्ण परत आल्यावर शिदोरी उघडताच कृष्णानी विचारलं, ‘‘सुदामा पोहे कुठे गेले?’’ मान खाली घालत सुदामा म्हणाला, ‘‘मी खाल्ले. मला खूप भूक लागली होती. मला क्षमा कर.’’ सुदामा सत्य लपवून स्वतःवर दारिद्र्याचा शाप ओढवून घेउन कृष्णप्रेमापोटी खोटं बोलत आहे हे  कृष्णानी ओळखलं. सुदाम्याच्या गळ्यात हात टाकत कृष्ण म्हणाला, ‘‘सुदामा! तू माझा अत्यंत जवळचा सुहृद आहेस. माझी क्षमा मागू नकोस.’’ पण त्याचवेळी सुदाम्याला येणार्‍या दारिद्र्याची कल्पना फक्त कृष्णालाच होती.

जेव्हा मोठेपणी दरिद्री सुदामा कृष्णाच्या भेटीला आला त्यावेळी आपल्यासाठी जीवनभर दारिद्र्य सोसणार्‍या त्या मित्राला भेटायला कृष्ण अनवाणी धावत सुटला.  त्याच्या मैत्रीची परतफेड करतांना कृष्णाला गहीवरून आलं--- कारण सुदमा आता खर्‍या प्रेमात ओतप्रोत भिजलेले मूठभर पोहे कृष्णासाठी घेऊन आला होता. लहानपणच्या पोह्यांची परतफेड म्हणून!  

मला वाटतं की, गोष्ट खरी असो वा नसो पण, ही गोष्ट ज्याच्या हृदयात निपजली, तो गोष्ट सांगणारा हा सुदामाच्या कुळीतला निरपेक्ष आणि मूकपणे मित्रासाठी दारिद्र्य भोगणारा तरी असावा किंवा कृष्णासारखा मित्राच्या आत्मसन्मानाला जराही धक्का पोचू न देता, मैत्रीची परतफेड करणारा तरी असावा.   मैत्री कशी असावी -----

 

ह्या पापण्यांस पुसणे , मैत्री कशी असावी

उडता जरा धुराळा  झाकून नेत्र घेई

 

हातांस ह्या विचारा, मैत्री कशी असावी

पडतोच घाव देही,  बघता स्वतः निवारी

 

हृदया जरा पहा या, मैत्री कशी असे ती

जरी झोपलेच सारे, विश्राम ना तयासी

 

मैत्रीत ना अपेक्षा, मैत्रीत ना उपेक्षा

न लाभ हानि यांची, करणे न ती समीक्षा

 

 मैत्रीस व्यापतो ना , व्यवहार कोरडा तो

बदल्यात काय मजला , हा प्रश्न फोल ठरतो.

 

कंठा बघून कंठी , हसतिच नेत्र प्रेमे

ठसका घशात अडके । नयनास धार इकडे

 

घडताच कृत्य काळे , हातून ते जरासे 

नेत्रास नीज ना ये, मुख मागते क्षमा ते

 

रुतता पदीच काटा, आऽऽई च येइ ओठा

न सांगणेचि लागे, हळुवार काढ बोटा

 

मैत्री कशी असावी, मैत्री अशी असावी

सर्वस्व अर्पुनीही, लव वाच्यता नसावी

--------------------------------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित

 

 

 

Comments

Popular posts from this blog

गोष्टी (अनुक्रमणिका)

जगन्नाथ पंडित

भोजराजाची अंतिम इच्छा आणि कालीदास