देवी कामाक्षी, मूकशंकर आणि मूकपञ्चशती -

 

देवी कामाक्षी, मूकशंकर आणि मूकपञ्चशती -

दक्षिण भारतात कांची नगरात घडलेली ही कथा. कांची नगरात फार पुरातन असे कामाक्षी मंदीर आहे. का म्हणजे सरस्वती. मा म्हणजे लक्ष्मी. अक्ष म्हणजे डोळे. सरस्वती आणि लक्ष्मी हे ज्या देवीचे डोळे आहेत अशी ती कामाक्षी. थोडक्यात विद्या यश आणि सम्पत्ती देणारी ही देवी आहे.

आपल्या गोष्टीचा कालावधी साधारणपणे आद्य शंकराचार्यांचा जो कालावधी होता त्या सुमारास किंवा थोडासा नंतरचा आहे. कांचीला विद्यावती नावाची ज्योतिष शास्त्रात पारंगत स्त्री होती. तिचा पतीही ज्योतिष शास्त्राचा चांगला अभ्यासक होता. त्या दोघांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचं नाव शंकर! शंकर हा जन्मजात बहिरा आणि मूका होता. त्यामुळे सारेजण त्याला मुका शंकरच म्हणत असत.

हा मुका शंकर कामक्षीदेवीच्या मंदिरात रोज जाऊन बसत असे. देवीच्या चेहर्‍याकडे तासन् तास बघत बसणार्‍या शंकराच्या मनात काय चालू आहे हे मात्र कोणाला कळत नसे. सकाळपासून रात्रीपर्यंत त्याचा वेळ देवीचा चेहरा निरखण्यातच जात असे. शेवटी हा मुलगा जसा मूकाबहिरा आहे तसा थोडासा वेडाही असावा असं लोकांना वाटू लागलं. मूका शंकर रोज देवळात असणारच हेही आता लोकांनी गृहीत धरलं. त्याचा काही उपद्रवही नसल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करून लोक आपलं आपलं देवीचं दर्शन घेऊन निघून जात.




एकदा संध्याकाळच्यावेळी देवीकडे टक लावून पाहणार्‍या मुक्या शंकराला भास झाला की देवी त्याच्याशी बोलत आहे. तो नीट निरखून बघू लागला. देवी खरच त्याच्याशीच बोलत होती. देवी म्हणाली, ``बाळ आज सूर्यास्तानंतर देवळात ये. मी तुला एका रात्रीसाठी वाणी देईन. तुला माझी जी काही स्तुती करायची असेल ती तू तेंव्हा कर.'' मूक शंकराचा आनंद गगनात मावेना. देवीने दिलेल्या दर्शनाने आणि दृष्टांताने तो हरखून गेला. आपल्याला देवीची स्तुती करायला वाणी मिळणार त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा त्याने ठरविले.

मूक शंकर धावत धावत गेला आणि त्याच्या मित्राला घेऊन आला. त्याला खूणांनी त्याने समजाऊन सांगितले की, ``तू आज रात्रभर माझ्यासोबत देवीच्या मंदिरात थांबून मी काय बोलेन ते सर्व लिहून घेशील.''

पहिल्यांदा मित्र थोडासा चकित झाला पण शंकरचा विलक्षण सच्चेपणा त्याला भावून गेला. मूक शंकरावर विश्वास ठेऊन सर्व लिहिण्याची सामग्री , प्रकाशासाठी दिवा, तेल घेऊन सूर्यास्ताच्या सुमारास दोघे देवळात पोचले. सूर्य मावळला. अंधार पडू लागला. देवळातील लोकांची वर्दळही कमी होत होत पूर्ण थांबली.

मूक शंकर देवीच्या चेहर्‍याकडे प्रसन्न चित्ताने बघत असता अचानक देवीने त्याच्याकडे पाहून स्मित केल्याचा भास त्याला झाला. देवीचं मुख समयीच्या प्रकाशात उजळून निघालेलं पाहून मूक शंकराच्या हृदयाची तार जणु झंकारली. अचानक देवीच्या स्तुतीचे शब्द स्फुरण पाऊ लागले. हृदयातील देवीची स्तुती ओठांवाटे स्तोत्र बनून बाहेर पडू लागली. मूक शंकराला वाणी मिळाली. देहभान हरपून शंकर स्तुती गाऊ लागला. सूर्योदयापर्यंत अखंड स्तुती गातच राहिला. सूर्याचा पहिला किरण मूर्तीवर पडला आणि नेत्रातून घळाघळा अश्रू वाहणार्‍या शंकराच्या तोंडून स्तोत्राचा शेवटचा श्लोक बाहेर पडला. एका रात्रीत देवीच्या स्तुतीपर श्लोकांची पाच शतकं शंकराच्या मुखावाटे बाहेर पडली. हीच स्तुती आज ‘‘मूकपंचशती’’ ह्या नावाने प्रसिद्ध आहे. (गूगलवर उपलब्ध आहे.) ह्यात श्लोकांची पाच शतके आहेत. प्रत्येक शतक 105 श्लोकांचे आहे.

ही शतकंही मोठी आश्चर्यकारक आहेत. त्यात पहिले एकशेपाच श्लोक हे फक्त देवीच्या सुंदर मुखाचं वर्णन करणारे आहेत तर पुढचे एकशेपाच श्लोक देवीच्या कोमल हातांच वर्णन करणारे आहेत. तिसर्‍या शतकातील एकशेपाच श्लोक तिच्या समचरण अशा पावलांवर रचले आहेत. तर चवथे शतक हे तिच्या सगुणरूपाचं वर्णन आहे आणि पाचवं शतक तिच्या निराकार निर्गुण रूपावर आधारित आहे.

मूक शंकरावर कामाक्षी प्रसन्न झाली. कामाक्षीमय झालेल्या तिच्या भक्ताला तिने विचारलं, "शंकरा, काय पाहिजे ते माग! '' ``माय, अजून काय पाहिजे. तू भेटलीस. ह्या देहीच मला विदेही केलेस. विदेहपणही हरण केलस. आता विदेहीपण नेलेस ही जाणीवही हरपली. ''

देवो देवपणे दाटला भक्तु भक्तपणे आटला दोघांचाही अंतु आला। अभेदे जाहला अनंतु॥ (एकनाथी भागवत अध्याय1, ओवी 89) अशी दोघांचीही स्थिती झाली. शंकराने देवीच्या पायावर डोई ठेवली आणि जळात जळ मिसळून जावं तसा त्या आदिशक्तीत शंकर मिसळून गेला.

काहीजण असेही सांगतात की मूकशंकराला नंतर कांचीच्या विद्याघनसरस्वती ह्या शंकराचार्यांनी सन्यासाची दीक्षा दिली आणि त्यांच्यानंतर मूकशंकराने कांचीपीठाचे शंकराचार्यपद भूषवीले.

शेवट काहीही असो पण देही विदेहीपण लाभलेल्या मूकशंकराने संन्यासी होणे काय किंवा त्याला सायुज्य मुक्ती मिळणे दोन्हीही सारखेच नाही का? सरस्वतीच्या कृपेमुळे मूकशंकर ज्ञानाकार आणि ज्ञानस्वरूप झाला.

-------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

ही 525 श्लोकांची मूकपंचशती नेटवर आपण वाचू शकाल. डॉ. प्रमोद लाळे (हैद्राबाद युनिव्हर्सिटी संस्कृत विभाग )यांचा मूकशतीचा मराठी अनुवाद प्रसिद्ध आहे.

 

Comments

Popular posts from this blog

गोष्टी (अनुक्रमणिका)

जगन्नाथ पंडित

भोजराजाची अंतिम इच्छा आणि कालीदास