‘‘ त्रिपिडाऽस्तु दिने दिने! ’’

 

‘‘ त्रिपिडाऽस्तु दिने दिने! ’’

एक दिवस भोजराजाच्या दरबारात एक माणूस  काही तरी भलताच आशीर्वाद घोकत राजापर्यंत पोचला. राजाला नमस्कार करून त्याने ‘‘ राजन् त्रिपिडाऽस्तु दिने दिने!’’ हा आपला आशीर्वाद मोठ्याने म्हटला. दिने दिने म्हणजे प्रत्येक दिवशी! दररोज! त्रि म्हणजे तीन. पीडा म्हणजे क्लेश, दुःख, यातना. ‘‘हे राजा रोज तुला तीन तीन प्रकारच्या पीडा असोत.’’ राजाला चांगला शुभ आशीर्वाद द्यायच्या ऐवजी हा काय अवलक्षणी आशीर्वाद! सारा दरबार राजा आता काय करतो हे घाबरून बघतच राहिला. राजानेही अत्यंत रागावून त्या माणसाला बंदी बनवून तुरुंगात टाकायची आज्ञा दिली.

तो माणूस गरीब दिसत होता. त्याला आपण काय गुन्हा केला हेही कळलं नसावं. कदाचित त्याला कोणीतरी असा आशीर्वाद दे असं पढवलेलंही असावं.  पण! तो माणूस अपराधी वाटत नाही हे कालिदासाच्या सराईत डोळ्यांना लगेचच उमगलं. अशा गरीबाला हकनाक शिक्षा होऊ नये म्हणून कालिदास लगेचच पुढे आला आणि राजाला म्हणाला,  

‘‘महाराज ह्या विद्वानाने आपल्याला फार मोठा आशीर्वाद दिला आहे.’’

राजा म्हणाला , ‘‘काय! रोज तीन पीडा होवोत हा काय उत्तम आशीर्वाद  आहे काय!’’ त्यावर प्रत्युत्पन्नमती कालदासाने राजाला पुढील श्लोक ऐकवला,

सभायां दानपीडाऽस्तु पुत्रपीडाऽस्तु भोजने

शयने पत्नीपीडाऽस्तु  त्रिपीडाऽस्तु दिने दिने ।।

म्हणजेच राजा,

सभेत दानपीडा हो पुत्रपीडा जेवता

पत्नी पीडा असो रात्री पीडा तीन तुला सदा ।।

राजा, काही पीडा ही सुखावणार्‍या असतात. ‘भोजराजा हा गुणग्राही आणि विद्वानांचा उचित सत्कार करणारा आहे अशी तुझी कीर्ती सर्वत्र झाली आहे. म्हणुन ह्या पंडितांना असे सांगायचे आहे की,

 

राजा तुझ्या सभेमध्ये प्राज्ञांची रीघ लागावी।

इष्ट दान तया देता थकावे हात रोजची ।।

लुडबूड मुलांची ती सतावो नित भोजनी

कधी घास तुला देवो सांडुनी कपड्यांवरी ।।

पत्नी भुणभुणो रात्री ‘‘अहो ना ऐकता कसे!’’

करो हट्ट तुझ्यापाशी सुखावे जो मनामधे ।।

पीडा तीन परी देती बहु सौख्य निरंतरी

रोज लाभो तुला त्याची आशीर्वादच भूपती ।।

हे राजन्! घरी दारी तिन्ही त्रिकाळी तुला सात्त्विक सुख लाभो असाच ह्या विदवानांच्या सांगण्याचा हितावह आशय आहे.’’ कालिदास बोलून थांबला आणि सभेमधले खरे विद्वान कालिदासाची वाहव्वा करून स्तुती करू लागले.

 भोजराजा कालिदासाच्या मनात असलेली दीन दुःखितांविषयी असलेली कणव जाणून होता. त्यामुळे कालिदासाची ही मल्लिनाथी ऐकून त्याने उदारहस्ते त्या आलेल्या माणसाला धनाची मदत केलीच आणि शिवाय कालिदासाचेही मनापासून कौतुक केले

-----------------------------

 5 march 2025

Comments

Popular posts from this blog

गोष्टी (अनुक्रमणिका)

जगन्नाथ पंडित

भोजराजाची अंतिम इच्छा आणि कालीदास